खून

Image copyright
Getty Images

प्रतिमा मथळा

सांकेतिक छायाचित्र

सोशल मीडियावर पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ शहरामधली एक दिशाभूल करणारी बातमी पसरवली जात आहे. एका टॅक्सी चालकाने आपण 120 दिवसांत 250 प्रवाशांची हत्या केल्याचं कबूल केलं, असं या बातमीत म्हटलं आहे.

dainikbharat.xyz या वेबसाईटवरील माहितीनुसार मोहम्मद सलीम असं या टॅक्सी ड्रायव्हरचं नाव आहे आणि गेल्या चार महिन्यांपासून तो दररोज 2 पेक्षा अधिक लोकांची हत्या करत होता.

indiarag.com या वेबसाईटनं उत्तर प्रदेशमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपेश जुनेजा यांच्या हवाल्यानं बातमी दिली आहे, की सलीमने हत्या केलेल्यांमध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. सलीम कारमध्ये बसलेल्या प्रवाशांची हत्या करून त्यांचं सामान लुटायचा आणि त्यांचे मृतदेह फेकून द्यायचा.

Image copyright
SM Viral Post

या दोन वेबसाईटशिवाय hinduexistence.org , hindujagruti.org , defence.pk आणि gellerreport.com या वेबसाईट्सवर ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यांनीही अशीची माहिती दिलीये.

Gallerreport.com ही अमेरिकन लेखिका पॅमेला गॅलर यांची वेबसाईट आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलनुसार त्या या वेबसाईटच्या संपादक आहेत.

भारतीय जनता पक्षाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीयसुद्धा ट्विटरवर त्यांना फॉलो करतात.

पॅमेला यांनी सोमवार 3 जून 2019 ला त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली बातमी ट्वीट करत लिहिलं, की मुस्लीम टॅक्सी ड्रायव्हरने 250 बिगर मुस्लिमांची हत्या केली आणि प्रसारमाध्यमात कोणतीही बातमी आली नाही.

Image copyright
Twitter

उजव्या विचारसरणीकडे झुकलेल्या अनेक फेसबुक ग्रुप्सने या वेबसाईटच्या लिंक पोस्ट केल्या आहेत. हजारो लोकांनी त्या शेअर केल्या आहेत.

Image copyright
hinduexistence.org

बीबीसीच्या शंभरपेक्षा अधिक वाचकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला या लिंक पाठवल्या आणि या कथित घटनेमागचं सत्य काय आहे हे पडताळून पाहण्याची मागणी केली.

आमच्या पडताळणीत आढळून आलं, की ही 12 वर्षं जुनी बातमी आहे. मोडतोड करून विविध वेबसाईट्सनं ती प्रसिद्ध केली आहे. त्या आधारावर लोक सोशल मीडियावर चर्चा करत आहेत.

12 वर्षं जुनं प्रकरण

सोशल मीडियावर फिरत असलेल्या या लिंक्सच्या मागचं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेशातील मेरठ पोलिसांशी संवाद साधला.

Image copyright
Twitter

गेल्या काही दिवसांत अशा प्रकारची कोणतीही घटना उजेडात आलेली नाही, असं त्यांनी म्हटलं. 2007 मध्ये असं एक प्रकरण उघडकीस आल्याचंही त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यात टॅक्सी गँगवर दोनशेपेक्षा जास्त लोकांची हत्या करण्याचा आरोप होता.

इंटरनेटवर रिव्हर्स सर्च केल्यावर असं लक्षात आलं, की मार्च 2007 मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी 250 पेक्षा जास्त लोकांची हत्या करणाऱ्या एका कथित टॅक्सी गँगला अटक केली होती. यासंबंधी काही बातम्याही आम्हाला इंटरनेटवर सापडल्या. या घटनेवर आधारित बातमी NEWS 18 ने प्रकाशित केली होती. त्या बातमीचाच बहुतांश भाग या वेबसाईटवर वापरला आहे. मात्र घटना, तारीख आणि तथ्यांमध्ये फेरफार केली आहे.

त्याचदिवशी टाइम्स ऑफ इंडियाने या प्रकरणावर एक बातमी प्रकाशित केली होती. मेरठ पोलिसांनी 29 मार्च 2007 ला जवळजवळ 35 लोकांच्या टोळीला अटक केल्याचं या बातमीत म्हटलं होतं.

Image copyright
Website Grab

या लोकांवर 2003 ते 2007 या काळात 250 लोकांची हत्या केल्याचा आरोप होता.

प्रसारमाध्यमांमधील बातम्यांनुसार चार वर्षांमध्ये (2003-2007) या गँगनं लखनौ, झाशी, कानपूर, फैजाबाद, बहरीच आणि मेरठसह अनेक शहरात लोकांची हत्या केली होती.

या टोळीला अटक केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं, की हे लोक टॅक्सी ड्रायव्हर असल्याचं सांगत लोकांना जाळ्यात फसवायचे आणि लूटमार करून लोकांची हत्या केली जायची. त्यानंतर त्यांचे मृतदेह निर्मनुष्य भागात फेकले जात असत.

पोलीस अधिकाऱ्याच्या नावाचा चुकीचा वापर

या जुन्या घटनेला आता पुन्हा धार्मिक रंग देत नव्याने सोशल मीडियावर पसरवलं जात आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं वेबसाईट्सनं छापली आहेत, ते आता त्या भागात कार्यरत नाहीत.

दीपेश जुनेजा 2007 मध्ये तिथे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र सध्या ते उत्तर प्रदेश पोलिसांच्या भरती विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

Image copyright
Twitter

जुनेजा 2007 मध्ये या टोळीवर कारवाई करणाऱ्या टीममध्ये होते.

त्यांच्यामते फेब्रुवारी 2007 मध्ये दोन लोकांच्या हत्येच्या चौकशीदरम्यान त्यांना काही पुरावे सापडले होते. त्यानंतर बहरीच इथून त्यांनी सलीम नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आणि त्याची कार जप्त केली.

6-7 जणांची एक टीम तयार करून लोक हत्या करत असल्याचं पोलिस तपासात समोर आलं. एका जिल्ह्यात हत्या केली की ते दुसऱ्या जिल्ह्यात जात असत.

या घटनेला काही धार्मिक रंग होता का हे जाणून घेण्यासाठी आम्ही दीपेश जुनेजा यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

2007 मध्ये झालेली ही घटना एक गुन्हा होता. त्याला कोणताही धार्मिक रंग नव्हता. सोशल मीडियावर दीपेश जुनेजा यांच्या नावाने ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्या खोट्या आहेत असं पोलिसांतर्फे सांगण्यात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.बीबीसी विश्वरोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)Source link

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *